तुंबलेल्या गटारांनी घेतला मोकळा श्‍वास

ढेबेवाडी बाजारपेठेत ग्रामपंचायतीची स्वच्छता मोहीम

ढेबेवाडी – गेली सहा वर्षांपासून तुंबलेल्या गटारांमुळे ढेबेवाडी बाजारपेठेत सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. गटारे तुंबल्यामुळे गटाराचे पाणी रस्त्याने वाहत होते. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत होता. सरपंच अमोल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुंबलेल्या गटारांची साफसफाई करण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात काम सुरू केल्याने तुंबलेल्या गटारांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या मोहिमेचे बाजारपेठेतील व्यापारी वर्गातून कौतुक केले जात आहे.

ढेबेवाडी हे विभागातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असल्याने याठिकाणी दररोज लोकांची मोठी वर्दळ असते. या वर्दळीच्या ठिकाणी गटारे तुंबलेली असल्याने त्याची दुर्गंधी पसरत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम तसेच साथीचे रोग पसरत होते. याची दखल घेऊन मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत ठोस पावले उचलून ही साफसफाईची मोहीम हाथी घेतली.

मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे सत्तांतर होऊन एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची सत्ता कॉंग्रेसचे नेते हिंदुराव पाटील गटाच्या ताब्यात आली. यावेळेपासून नवीन गावकारभाऱ्यांनी गावच्या विकासाचा व पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करीत कुठे काय काम केले पाहिजे, कुठे कोणाच्या समस्या आहेत, याचा अभ्यास करून नवनवीन उपक्रम हाती घेतले. गावच्या आरोग्याच्या दृष्टीने गावात आरोग्य शिबिर व गटारांची साफसफाई तसेच गावात रोगराई पसरू नये. म्हणून उपाययोजना राबविल्या आहेत. सन 2018 मध्ये जन्माला आलेल्या मुलींच्या नावे 5 हजार रुपयांची ठेव पावती, गाव कचरामुक्त व्हावे, म्हणून गावात घंटागाडी व कचऱ्यापासून गांडूळ खत प्रकल्प तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोणाच्या ध्यानात नसलेल्या वांग नदी साफसफाई हा मोठा निर्णय ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेत स्वच्छता मोहीम राबवली.

सहा वर्षापासून रेंगाळत असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न एक महिन्यात निकाली काढून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. गावामध्ये हिंदुराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तीन नळ पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.