विचार : नतमस्तक

अमोल भालेराव 

पहाटे चारची वेळ. अवंती जागी झाली. सारे काही आटोपून सवयीप्रमाणे अंगणात गेली. पहाटेच्या मंद अंधारात अंगणात पडलेल्या पारिजातकाच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा सडा उठून दिसत होता. तिने त्यातली काही फुले वेचली आणि देवघरातील देवांच्या पायाजवळ वाहून नमस्कार केला. अवंती पुन्हा आपल्या रूममध्ये गेली. रियाझ करण्यासाठी तिने तंबोरा हाती घेतला. रियाझ सुरू करण्यापूर्वी त्यावर आपले मस्तक टेकविले आणि डोळे मिटून घेत एकेका सुराला साद घालू लागली. दिवस उजाडता उजाडता तिच्या कर्णमधुर आवाजाने घरातील मंडळींना जाग येत होती. बऱ्याच वेळानंतर रियाझ करून झाल्यानंतर अवंती रूममधून बाहेर आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाश्‍त्याची तयारी करत करतच तिने आपली बॅग भरायला सुरुवात केली. आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तिचं एक स्वप्न पूर्ण होत आलं होतं. संगीत स्पर्धेतील आजच्या अंतिम दिवसासाठी ती सज्ज झाली होती. आता अवघे काही तासच शिल्लक होते, तिच्या ध्येयापर्यंत पोचायला. घरातून बाहेर निघताना आजीच्या पायावर तिने डोके ठेवले. “यशस्वी हो!’ असे म्हणत आजीने आपल्या नातीच्या डोक्‍यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. आईबाबांचेही आशीर्वाद घेऊन अवंती निघाली. एकेक करत स्पर्धकांनी आपली गाणी सादर केली. शेवटी अवंती व्यासपीठाकडे जाऊ लागली. व्यासपीठावर पाऊल ठेवण्यापूर्वी दोन्ही गुडघे टेकवत ती त्या व्यासपीठाला नतमस्तक झाली.

तिने तंबोरा छेडला आणि तिच्या गळ्यातून आलेल्या सुरांना दाद म्हणून रसिकांनी खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहातून टाळ्यांचा असा काही कडकडाट कानी पडला, जणू अवंती हीच प्रेक्षकांची पसंती होती! आणि हो अगदी तसेच घडले. अवंती विजेती ठरली. आणि पुन्हा एकदा त्याच व्यासपीठावरून सर्वांसमोर नतमस्तक होत तिने तो पुरस्कार आणि प्रेक्षकांचं प्रेम स्वीकारलं. वर्षानुवर्षे ती सुरांची पूजा करत आली होती; वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची थाप तिच्या पाठीवर पडत होती. आणि आज या व्यासपीठाने साऱ्या जगाला तिची ओळख करून देताना, तिच्या ‘नतमस्तक’ होण्याला जी भरभरून दाद दिली होती, ते सारं म्हणजे होतं तिचं स्वप्न…!

आपल्यालाही अशी अनुभूती आली असेल कित्येकदा, नतमस्तक होण्याची आणि त्यातून होणाऱ्या साध्यतेची. आपण ‘नतमस्तक’ होतो म्हणजे नेमके काय होते ? कुणाच्या तरी कर्तृत्वाचा आदर, वयाचा मान, किंवा मनातील सारी किल्मिषे दूर करत जपलेले ऋणानुबंध. कदाचित आपल्यातील ‘मी’ पण त्या ठिकाणी गळून पडत नसेल. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा थकलेलं शरीर आणि मन घेऊन देवाच्या गाभाऱ्यात जाऊन आपण जे करतो ते असते नतमस्तक होणे. काही जण त्यात त्यांचा स्वार्थ शोधत असतील, तर काहीजण नि:स्वार्थीपणे.

काही तरी अपुरं असलेलं पुरं करण्याची शेवटची आस घेऊन त्याच्याकडे गेलेलो असतो आपण त्याच्याकडे. आणि ती आस पूर्ण होताच पुन्हा जाऊन आपण त्याचे पाय धरतो. नकळत डोळ्यावाटे येणाऱ्या अश्रूंमध्ये देवाप्रती समर्पणचा भाव असतो. तिथे मात्र आपण स्वतःचे नसतो, त्याचेच होऊन जातो.

आपल्या खूप जवळचं कोणी तरी मृत्यूशी झुंज देतंय, आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या त्या डॉक्‍टरपुढे आपण नतमस्तक होतो. का? तो कुठे देव आहे? तोही आपल्यासारखाच एक माणूसच आहे. पण तरीही त्यावेळेस मात्र त्याला आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात देवाचे स्थान देतो. त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत मंदावलेल्या श्‍वासाला पुन्हा एकदा जगण्याची उमेद दिलेली असते. मातीत पेरलेलं उगवायचंय. मला याच मातीत जगायचंय आणि मरायचंय. फक्‍त तू साथ दे, कधीची तहानलेली आहे ती; तुझ्या सरींनी तिला तृप्त कर एकदाची. असं म्हणत आपल्या तळहातांच कवडसे करून त्या आभाळाकडे पाहून पुन्हा नतमस्तक होताना या धन्याला एकच आस असते, फुटेल या आभाळाचाही मायेचा बांध आज नाही तर उद्या…!

खरंच का कमीपणा असतो कुणापुढे नतमस्तक होण्यात ? कमीपणा नाही हो; मोठेपणा लागतो मनाचा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो तो म्हणजे कृतज्ञतेचा भाव, शालीनतेचे संस्कार, कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवरच ठेवण्याची ताकद…! नाही तरी आजही काही लोक आहेतच समाजात आपल्या जन्मदात्या मातापित्यासमोरही नको म्हणतात झुकायला. पण तरीही त्या जन्मदात्यांकडून त्यांना मात्र आशीर्वादच मिळत असतात. कारण तेच आईबाप जेव्हा त्यांच्या देवासमोर नतमस्तक होतात, त्यावेळेस ते तुमच्याच सुखासाठी त्याच्यापुढे हात पसरत असतात…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)