मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला असून महत्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा या आवाहनाला आणि नियमांकडे सपशेलपणे दुर्लक्षित केले जात आहे. कारण आरे कॉलोनीमध्ये काही जण लॉकडाऊनचे नियम धुडकावून पार्टी करताना आढळले आहेत. या ठिकाणी पार्टी करणाऱ्या 33 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरे कॉलोनीतील रॉयल पालमसमध्ये शनिवारी संध्याकाळी ही पार्टी सुरू होती. ही लोकं विकेंडसाठी येथे जमली होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन करून पार्टी सुरू असल्याची माहिती दिली. ज्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहचले आणि कारवाई केली. पार्टीच्या वेळी नियमांची सपशेल पायमल्ली झाल्याचे चित्र होते. सुरक्षित अंतर नाही, तसंच मास्क घातले गेले नव्हते. ही लोकं मुंबईच्या विविध भागातून आली होती. तर काही जण गुजरात मधून आल्याचे कळत आहे.
काही दिवसांपूर्वी वांद्रे जिमखान्याचा 85 वा वर्धापण दिन होता. जो साजरा करण्यासाठी जिमखान्यातील सभासद एकवटले होते. त्यावेळी सुद्धा नियमांची अशाच प्रकारे पायमल्ली करण्यात आली होती. या संदर्भात मुंबई पोलिसांनी जिमखान्याच्या अध्यक्षांसह 15 सभासदांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.