भाजप म्हणजे देशाला 440 व्होल्टसारखा धोका – ममता बॅनर्जी यांच्याकडून टीका

पान्दुआ – भारतीय जनता पार्टी म्हणजे 440 व्होल्टसारखा देशाला धोका आहे, अशा शब्दात तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. देशवासियांनी भाजपला मतदान करू नये. जर तृनमूल कॉंग्रेस सत्तेवर आली, तर देशाला कोणताही धोका असणार नाही, असे बॅनर्जी म्हणाल्या. हुगळी जिल्ह्यातील पान्दुआ येथील प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या.

भाजपला 80 जागा मिळतील

लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला 80 जागाही मिळणार नाहीत. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पंजाब, केरळ, पश्‍चिमबंगाल आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये भाजपला एकही जागा मिळणार नाही. तर गुजरात, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये मतविभाजन होईल, असा दावाही त्यांनी केला.

भाजप आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशाची वाट लावतील. भाजप हा आपल्या देशासाठी 440 व्होल्टसारखा धोका आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर हजारो बेरोजगार झाले आहेत. गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. भाजपच्या शासनकाळात लोकांना बॅंकांमधूनही पैसे मिळत नाहीत, असे सांगून भाजपला मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष सहकार्य आहे. “सीपीएम’चे गुंड आता भाजपचे उस्ताद झाले आहेत, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

भाजपसारखा धर्माच्या आधारावर देशात फूट पाडणारा पक्ष पुन्हा सत्तेत कसा येऊ शकतो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप हा हिंदूंचा पक्ष कसा असू शकेल ? भाजपला हिंदूंबाबत काहीही आदर नाही. भाजपतर देशात अशांतता माजवत आहे. उलट तृणमूल कॉंग्रेसने तारकेश्‍वर, गंगासागर, दक्षिणेश्‍वर, तारपिठ आणि कांकालिताला सारख्या हिंदू देवस्थानांचा विकास केला आहे. पंतप्रधान नेहमीच खोटे बोलत राहिले आहेत. पश्‍चिम बंगालमधील लोकांना असुरक्षित वाटते, असे खोटे ते बोलायला लागले आहेत, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)