नवी दिल्ली: महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना देशभक्त असा किताब देणारे वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की त्यांचे हे विधान पक्षाच्या तत्वांच्या विरोधात असून त्यांच्या विधानाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. त्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत येत्या दहा दिवसात अहवाल सादर करा अशी सुचना पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे करण्यात आली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी केलेली ही आक्षेपार्ह विधाने त्यांची व्यक्तीगत विधाने असून त्याचा पक्षाशी काहींही संबध नाही असेही अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.या विधानांबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली असून त्यांनी हे विधान मागे घेतले असले तरी ते भाजपच्या आणि सार्वजनिक हिताच्या तत्वाच्या विरोधात आहे. त्याची गंभीर दखल घेऊन हा विषय पक्षाच्या शिस्तभंग विरोधी समितीकडे पाठवण्यात आला आहे असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.
नथुराम गोडसे यांच्या विषयी अशाच स्वरूपाची आक्षेपार्ह विधाने केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे, नलिनकुमार कातील यांनी केली आहेत त्यांनाही पक्षाने कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्याकडूनही या विषयी खुलासा मागवण्यात आला आहे असे अमित शहा यांनी म्हटले आहे.