बंगळुरूचा पराभवाचा “षटकार’

बंगळुरू: कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या आश्‍वासक कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्य संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा चार गडी आणि 7 चेंडू राखून पराभव करत स्पर्धेत आगेकूच नोंदवली. दरम्यान बंगळुरूचा लागोपाठ सहावा पराभव ठरला असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 149 धावांची मजल मारत दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य 18.5 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा करत पुर्ण केले. या विजयासह दिल्लीचे सहा सामन्यांमध्ये सहा गुण झाले आहेत. तर बंगळुरूच्या विजयाची पाटी अद्यापही कोरीच आहे.

प्रत्युत्तरात उतरलेल्या दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर शिखर धवन पहिल्याच षटकात एकही धाव न करता माघारी परतला. यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉयांनी दुसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागिदारी रचत विजयाकडे आक्रमक पद्धतीने कूच केली. मात्र, 5 चौकार मारत 28 धावा करणाऱ्या पृथ्वीला आपल्या दमदार सुरुवातीला मोठ्या खेळीत रुपांतरीत करता आली नाही. त्याला नेगीने 9 व्या षटकात बाद केले. पृथ्वी बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने इनग्रामच्या साथीने दिल्लीला 13 व्या षटकात शतकाच्या जवळ पोहचवले. संघाचे शतक झळकल्यानंतर इन्ग्राम 22 धावा करुन परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 50 चेंडूत 8 चौकार 2 षटकार मारत 67 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी 15 चेंडूत 5 धावांची गरज असताना तो बाद झाला. यानंतर अक्षर पटेल आणि राहुल तवेतिया यांनी संघाच्या विजयाची औपचारिकता पुर्ण केली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूची सुरूवात खराब झाली. ख्रिस मॉरिसच्या पहिल्याच चेंडूवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला जीवदान मिळाले. मॉरिसने टाकलेला चेंडू तिसऱ्या स्लीपमधून मारण्याचा कोहलीने प्रयत्न केला. परंतु, शिखर धवनच्या हातातून झेल सुटला. मात्र, षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार्थिव पटेलला बाद करून मॉरिसने दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. पटेल माघारी परतल्यानंतर कोहली व डिव्हिलियर्स यांनी बंगळुरूच्या डावाला आकार दिला. यावेळी बंगळुरूने पॉवर प्लेमध्ये 2 बाद 40 धावा केल्या. फटकेबाजी करण्याच्या तयारीत असलेल्या डिव्हिलियर्सला सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडाने माघारी धाडत बंगळुरूला दुसरा धक्‍का दिला.

यानंतर, कोहली व मार्कस स्टोइनिसने संयमी खेळ करत संघाला 10 षटकांत 2 बाद 64 धावांपर्यंत मजल मारून दिली. 11व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेलने स्टोइनिसला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर मोइन अली आणि कोहलीने वेगाने धावा करत बंगळुरूची धावगती वाढवण्यावर भर दिला. यावेळी अलीने 15व्या षटकात संदीप लामिचानेच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून बंगळुरूला शतकी वेस ओलांडून दिली. पण, पुन्हा पुढे जाऊन फटका मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि ऋषभ पंतने त्याला यष्टिचीत केले. अलीने 18 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 32 धावा केल्या.

संदीपची ही ट्‌वेंटी-20 सामन्यांतील 50वी विकेट ठरली. तर, अक्षर पटेलनेही विकेटचे शतक पूर्ण केले. कोहली एका बाजूने संयमी खेळी करून विकेट टिकवून होता. यावेळी आलेल्या आकाशदीप नाथने आल्या आल्या चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पाठोपाठ 15 व्या षटकानंतर कर्णधार विराटनेही आपला गिअर बदलला. विराटने संदीपच्या एकाच षटकात लागोपाठ दोन षटकार मारले. पण, श्रेयस अय्यरने चेंडू रबाडाकडे सोपवतातच त्याने विराटचा अडसर दूरु केला. यावेळी विराटने 41 धावांची खेळी केली. पाठोपाठ अक्षयदीप नाथ आणि पवने नेगीला त्याच षटकात बाद करत आरसीबीचा मोठा स्कोर उभारण्याच्या आशेवर रबाडाने रणगाडा फिरवला. आरसीबीला 20 षटकात 149 धावांपर्यंतच मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 20 षटकांत 8 बाद 149 (विराट कोहली 41, मोइन अली 32, कगिसो रबाडा 4-21) पराभुत विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 18.5 षटकांत 6 बाद 152 (श्रेयस अय्यर 67, पृथ्वी शॉ 28, नवदीप सैनी 2-24).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)