तौसिफ शेख यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यास टाळाटाळ; मागितली इच्छा मरणास परवानगी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून मागितली इच्छा मरणास परवानगी

नगर: दावल मलिक ट्रस्ट या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केलेल्या मयत तौसिफ हासिम शेख याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच न्याय देण्यास जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या निषेधार्थ शेख कुटुंबीयांनी शनिवारी (दि.15) सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत इच्छा मरणास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

मयत तौसिफ शेख यांचे वडील हासिम कलिंदर शेख, आई अनवर हासिम शेख, पत्नी फरीदा तौसिफ शेख व दोन लहान मुलींनी हे आंदोलन सुरु केले आहे. तौसिफ शेख यांनी कर्जत येथील दावल मलिक ट्रस्ट या जागेवरील अतिक्रमण काढणेसाठी दि.20 डिसेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन केले होते. त्यामध्ये तौसिफ शेख यांचा मृत्यू झाक्‍याच्य घटनेस पाच महिने होवूनही त्यांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही.

मुख्यमंत्री निधीतून मिळणाऱ्या रक्कमेसाठी मयत तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सर्व कागदपत्रे सादर केलेली होती. परंतु अद्याप मयताच्या वारसांना मुख्यमंत्री निधी मिळालेला नाही. त्यामध्ये दोषी असलेले संबंधित अधिकारी व कर्मचारी व दावल मलिक ट्रस्टचे अध्यक्ष जहांगिर इब्राहिम शेख यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. व मयत तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत म्हणून 50 लाख रुपये मिळावेत. सदरील कुटुंबीयांना मदत मिळणेकामी वेळोवेळी कागदपत्रांची पुर्तता केली आहे. तरीही 5 महिने उलटून देखील शासकीय स्तरावरुन कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही. त्यामुळे यांचे कुटुंबीयांचे पुर्नवसन करुन आपल्या विशेष अधिकारामधून त्यांच्या पत्नीस शासकीय नोकरी मिळावी. या मागण्या मान्य करता येत नसतील तर शेख कुटुंबाला इच्छा मरणास परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


पित्याच्या फोटोकडे चिमुकलीची धाव

मयत तौसिफ शेख याचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यास बसले असताना तौसिफच्या लहान मुलीही तेथे होत्या. आंदोलन स्थळी आंदोलनाची माहिती देणारा फ्लेक्‍स बोर्ड लावण्यात आलेला होता.त्या बोर्ड वरील मयत तौसिफ शेख याच्या फोटो कडे त्याची 3 वर्षाची मुलगी खुशबू हिचे लक्ष जाताच तीने अब्बा अब्बा करत त्या फोटो कडे धाव घेतली. फोटो वर हात फिरवत अब्बा कब आओगे असे म्हणत रडायला सुरुवात केली. हे दृश्‍य पाहून उपस्थित सर्वच गहिवरून गेले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या.


पालकमंत्र्यांच्या बैठकीमुळे पोलिसांची व प्रशासनाची दडपशाही
मयत तौसिफ शेख याचे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केल्यावर पोलिस तेथे आले.त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे थातूर मातुर आश्‍वासनाचे पत्र शेख कुटुंबियांना देत आंदोलकांना तेथून उठवून दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. ती संपेपर्यंत त्यांना प्रांताधिकारी कार्यालयाजवळील एका पत्र्याच्या शेड मध्ये बसा असे सांगत आंदोलकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी लावलेला बोर्ड ही काढून टाकला. त्यामुळे शेख कुटुंबाला अडगळीच्या ठिकाणी आंदोलनास बसावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)