पालखी मार्गावर नियोजन अधिकाऱ्याची नियुक्‍ती

वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याबाबत नियोजनाचे काम पाहणार


वारी सोहळ्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

पुणे – आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यातील पालखी मार्गावर ठराविक भागासाठी एका नियोजन अधिकाऱ्याची (इन्सिडेंट कमांडंट) नियुक्ती करण्यात आली आहे. हा अधिकारी आणि त्यांचे पथक यांच्याकडे संबंधित भागातील वारकऱ्यांसाठी असलेल्या विविध सोयीसुविधा पुरविण्याबाबत नियोजनाचे काम असणार आहे.

आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे दि. 24 जूनला प्रस्थान करणार आहे. दि. 6 जुलै रोजी ही पालखीचे इंदापूरहून सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे. तर श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी दि. 25 जून रोजी प्रस्थान करणार असून दि. 2 जुलैपर्यंत ही पालखी जिल्ह्यात असणार आहे. जिल्ह्यात दोन्ही पालख्या असताना विविध भागांसाठी एका नियोजन अधिकाऱ्यांची नेमणूक जिल्हा प्रशासनाने केली आहे.

उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांची नियुक्ती याकरिता करण्यात आली आहे. याबरोबरच उपनियोजन अधिकारी म्हणून तहसीलदारांची निवड करण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांचे पथकही असणार आहे. या नियोजन अधिकाऱ्यांकडे असलेल्या भागात वारकऱ्यांसाठी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वीजजोडणी, वाहतूक, अन्न, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अशा विविध यंत्रणांशी समन्वय साधून सुविधा देण्याचे काम असणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत असतात. त्यामुळे ज्या भागातून पालखी मार्गस्थ होणार आहे. त्या भागात एका नियोजन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यानुसार नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांकडे पालखी मार्गावरील ठराविक भाग देण्यात येणार आहे.

वारकऱ्यांसाठी मोबाइल ऍप
गेल्या दोन वर्षांपासून वारकरी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पालखी सोहळा ऍप उपलब्ध करून देण्यात येते. यंदा हे ऍप दि. 20 जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच हे ऍप वापरणे शक्‍य नसणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी सोहळ्याचे नियोजन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी असलेली पुस्तिका तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही पुस्तिका तयार झाल्यानंतर ती दोन्ही पालख्यांचे विश्‍वस्त आणि वारीमध्ये वारकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)