महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना दिले स्मार्ट फोन

पुणे – अंगणवाडी सेविकांना बालकांच्या दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी तसेच पोषण आहाराचे वाटप याबाबतच्या सर्व नोंदी रजिस्टरमध्ये घ्याव्या लागत होत्या. यापुढे ते सर्व मोबाइलवरील ऍपवर नोंदी भरल्या जात आहेत. यासाठी जिल्ह्यात 4 हजार 614 अंगणवाडी सेविकांना “स्मार्ट फोन’ देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्यासाठी “कॅस’ या ऍपची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत आहेत. यापुढे अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन आल्याने त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामांचा आढावा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हे ऍप कसे वापरायचे याबाबत एक महिन्यांपूर्वीच जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.