पुणे – कंत्राटदारांनी बांधकाम कामगारांची नोंदणी करावी

पुणे – “बीओसीडब्ल्यू’ अर्थात “महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत पुण्यात आतापर्यंत 19 कोटी रुपयांचे लाभ वितरीत करण्यात आले असून 34 हजार कामगारांना त्याचा फायदा मिळाल्याची माहिती कामगार विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त शैलेंद्र पोळ यांनी दिली. यापुढे प्रत्येक बांधकाम कामगार हा नोंदितच असायला हवा, असा आग्रह धरला जाणार असून कंत्राटदारांनी कामगारांची नोंदणी करून घेण्यास पुढाकार घेतल्यास विकसकांना अडचण सोसावी लागणार नाही, असेही पोळ म्हणाले.

“क्रेडाई पुणे मेट्रो’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे कामगारांच्या नोंदणीबाबत कंत्राटदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पोळ यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत दोनशेहून अधिक कंत्राटदार उपस्थित होते. कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर, “क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष सुहास मर्चंट, “कामगार कल्याण समिती’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, “क्रेडाई पुणे मेट्रो’चे रणजीत नाईकनवरे, आदित्य जावडेकर, समीर बेलवलकर, कामगार कल्याण समितीचे निमंत्रक पराग पाटील, “क्रेडाई’ पुणे “मेट्रोचे महासंचालक’ डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का, संस्थेचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी या वेळी उपस्थित होते.

कामगार नोंदणीची प्रक्रिया आणि या नोंदणीद्वारे सरकारकडून मिळणाऱ्या लाभांची माहिती मुजावर यांनी दिली. यात कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर आर्थिक साहाय्य, आरोग्य योजनेतील समावेशाबरोबरच कामगाराच्या कुटुंबीयांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी, कामगारास अपंगत्त्वासाठी तसेच त्याच्या पत्नीस प्रसूतीसाठी विशेष आर्थिक साहाय्य, कामगाराचा कामावर अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणारे साहाय्य, घरखरेदी, घरबांधणी, अवजार खरेदी इत्यादींसाठी कामगारांना मिळणारी मदत, कामगारांना देण्यात येणारे सुरक्षा किट आणि आवश्‍यक वस्तूंचे किट आदींचा समावेश आहे.

कामगारांच्या मनात नेहमी उद्या आपले व कुटुंबाचे कसे होणार याची चिंता असते. मात्र बीओसीडब्ल्यू नोंदणीद्वारे मिळणाऱ्या लाभांमुळे ती चिंता काही प्रमाणात निश्‍चित कमी होईल आणि त्याच्या कामाचा दर्जा वाढेल. हे लाभ मिळणे हा कामगारांचा न्याय्य हक्‍क आहे, असे मर्चंट म्हणाले.

लवकरच बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी अगदी अल्प दरात चांगले जेवण उपलब्ध करून देण्यात येण्याची योजना बीओसीडब्ल्यूमार्फत राबवली जाणार असून त्यामुळे त्यांना आणखी फायदा होईल. कामगारांना या मंडळाद्वारे जवळपास 28 प्रकारचे लाभ दिले जात असून प्रत्येक कामगाराला नोंदणीद्वारे ते प्राप्त होतील याची काळजी कंत्राटदारांनी व विकसकांनी घ्यायला हवी.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×