अनन्या पांडेने यावर्षी करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. वयाच्या 20 व्या वर्षीच तिला हिट सिनेमाने करिअरला सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे. लहान वयात यश मिळाले की एकदम मोठे झाल्यासारखे वाटते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले “स्टार किडस’ आता अचानक स्टार झाल्यासारखे वागायला लागले आहेत. त्यांच्या भोवतालच्या ग्लॅमरने त्यांच्यात हा बदल केला आहे. मात्र अनन्या अजूनही लहानच आहे. तिच्या भोवतालचे वातावरण बदलले असेल, मात्र तिचे वय वाढलेले नाही. कारण वयाने लहान असल्यामुळे तिला मुंबईतल्या एका क्लबमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.
मुंबईतल्या लोअर परळ भागातल्या एका क्लबमध्ये अनन्या गेली होती. पण त्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान 24 वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे. अनन्या तर अजून 20 वर्षांचीच आहे. याच कारणास्तव तिला रोखले गेले. तिने विनंती करूनही तिला प्रवेश दिला गेला नाही. अनन्या गेल्या आठवड्यात सुहाना खान, आर्यन खान आणि शनाया कपूरबरोबर भटकताना दिसली होती. या सगळ्या स्टारकिडबरोबर मौज मजा करण्याच्या नादात ती क्लबचे नियम विसरली आणि थेट प्रवेश मिळेल या आशेने क्लबवर गेली होती.
“स्टुडंट ऑफ द इयर 2′ नंतर अनन्या “पती, पत्नी और वो’मध्येही असणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकरही आहेत. कार्तिक आर्यनबरोबर अनन्याची जरा जास्तच खास दोस्ती आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये अनन्याला कार्तिकबरोबरच्या रिलेशनबरोबर विचारले, तेंव्हा “तो अगदी क्युट आहे. फनी आहे.’ असे उत्तर तिने दिले. यातून काय समजायचे ते समजा. खरे तर हा प्रश्न तिला विचारणेच चुकीचे होते. कारण अनन्या अजून लहानच आहे.