सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची अनपेक्षित भेट

सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आले उधाण

सोलापूर – सोलापूर लोकसभेचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची शनिवारी सकाळी बालाजी सरोवर येथे अनपेक्षित व योगायोगाने भेट झाली. प्रकाश आंबेडकर हे आपले सहकारी बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे व बाळासाहेब वाघमारे या दोन कार्यकर्त्यांसह नाश्‍ता करत असताना सुशीलकुमार शिंदे याच वेळी बालाजी सरोवर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर येथेच बसले आहेत. म्हटल्यावर त्यांनी तिथे जाऊन भेट घेतली. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अर्थात राजकारण हा विषय झाला नाही. अवघ्या काही मिनिटांचा हा प्रसंग होता.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा असताना त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर चर्चा करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आपली त्यादिवशी सोलापुरात मुख्यमंत्र्यांशी भेट झालेली नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

शिंदे आणि आंबेडकर यांच्या काही सेकंदाच्या भेटीनंतर छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. निवडणूक सुरु असताना आणि सोलापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत टीका करण्यात आल्यानंतर आंबेडकर आणि शिंदे यांची भेट झाली कशी? का कोणीतरी या दोघांची भेट घडवून आणली ? याबाबत चर्चा सुरु झाली. माध्यमांनी या भेटीची “ब्रेकिंग न्यूज’ करत शिंदे-आंबेडकरांच्या भेटीला गेल्याच्या बातम्या दिल्या. त्यानंतर कॉंग्रेसने स्पष्टीकरण देत दोघे एकमेकांच्या जवळ आल्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात आले. कॉंग्रेसने जरी या भेटीबाबबतचे स्पष्टीकरण दिले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र उलटसुलट चर्चेला खतपाणी मिळाले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)