आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर औषध खरेदीला मुहूर्त

निविदा प्रसिद्ध; स्थायी समितीसमोर लवकरच प्रस्ताव

पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातंर्गत येणाऱ्या मध्यवर्ती औषध भांडार विभागाला नव्या निविदेनुसार करण्यात येणाऱ्या औषध खरेदीला आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आता मुहूर्त सापडला आहे. निविदा भरण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, निविदांना मिळणारा अल्प प्रतिसाद, लोकसभा निवडणूक आचारसंहिता अशा विविध कारणांमुळे ही निविदा प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, ऍलोपॅथिक औषध खरेदीचा 18 कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच स्थायी समिती सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

रेंगाळली नवी निविदा प्रक्रिया
महापालिकेने 2018 ते 2020 अशा दोन वर्षांच्या औषध खरेदीसाठी 19 नोव्हेंबर 2018 ला 25.60 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. निविदा भरण्यात ठेकेदार संस्थांना तांत्रिक अडचणी जाणवल्या. पर्यायाने, 14 जानेवारी 2019 ला फेरनिविदा मागविल्या. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे 22 ते 28 जानेवारी दरम्यान मुदतवाढ देण्यात आली.

मुदतवाढीनंतर 23 निविदा प्राप्त झाल्या. त्यातील 21 निविदा वैद्यकीय विभागातंर्गत असलेल्या औषध निवड समितीने तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरविल्या. त्यापैकी 19 जणांनीच ऍलोपॅथी औषधासाठी दरपत्रक भरले. 798 ऍलोपॅथिक औषधांसाठी दर मागविले होते. त्यातील 108 औषधांसाठी दर मिळाले नाहीत. त्यामुळे 690 औषधांचे दर निश्‍चित करताना त्यातील 7 प्रकारची औषधे जादा दरामुळे निवड समितीने वगळली. पर्यायाने, आता 683 औषधांच्या खरेदीसाठी 16 कोटी 49 लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समिती सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

महापालिका रूग्णालये व दवाखान्यांसाठी महापालिकेतर्फे सध्या जुन्या निविदेनुसारच औषध खरेदी केली जात आहे. जुनी निविदा ही 2016 ते 2018 अशा दोन वर्षांसाठी होती. त्याची मुदत संपली आहे. मात्र, नविन निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जुन्याच ठेकेदाराला सध्या मुदतवाढ दिलेली आहे. जुन्या निविदेनुसार मार्च अखेरपर्यंत औषध खरेदीसाठी 25.06 कोटी इतका खर्च झाला आहे. ऍलोपॅथिक, सर्जिकल, आयुर्वेदिक, डेंटल आदींशी संबंधित एकूण 1667 प्रकारच्या औषधांच्या खरेदीसाठी या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, 1603 औषधांसाठीच ठेकेदारांकडून दरपत्रक प्राप्त झाले. त्यानुसार खरेदी झालेली आहे.

ऍन्टी रेबीज लसीचा तुटवडा
भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांसाठी आवश्‍यक असलेल्या ऍन्टी रेबीज लसीचा तुटवडा सध्या महापालिका रुग्णालयांमध्ये जाणवत आहे. महापालिकेकडून दोन टप्प्यांमध्ये 3 हजार लसींच्या व्हायल्स खरेदी करण्यात येणार आहे.

सर्जिकल व अन्य औषधांसाठी प्रतीक्षा
मुळ निविदेतील शिल्लक असलेल्या 108 ऍलोपॅथिक आणि 28 सर्जिकल औषधांसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी अनुक्रमे 86.45 लाख आणि 51.62 लाख इतका खर्च होणार आहे. मुळ निविदेतील सर्जिकल (386), आयुर्वेदिक (183) आणि डेंटल (103) प्रकारातील औषध खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)