दुचाकीच्या टायरमधील हवा सोडून जॅमर काढला
पुणे – नो-पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकीला वाहतूक पोलिसांनी जॅमर लावला. त्यानंतर दोन तरुणींनी चाकातील हवा सोडून हुशारीने जॅमर काढला. त्या हवा भरण्यासाठी गेल्या असता वाहतूक पोलीस आणि दामिनी पथकाच्या त्या हाती लागल्या. वाहतूक पोलिसांनी लावलेला जॅमर शिताफीने काढण्याचा प्रयत्न केलेल्या या मुलींना मात्र कारवाईला सामोरे जावे लागले. एखाद्या जाहिरातीमध्ये शोभेल अशी घटना जंगली महाराज रस्त्यावर घडली.
नो-पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या एका दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी नियमानुसार कारवाई करत जॅमर लावला होता. वाहन चालविणाऱ्या तरुणींनी पोलीस दुसऱ्या कामात व्यस्त असल्याचे पाहात, चाकातील हवा सोडून चाक पंक्चर केले आणि जॅमर रस्त्यातच टाकून निघून गेल्या. वाहतूक पोलिसांनी दामिनी पथकाशी संपर्क साधला असता, डेक्कन परिसरामध्ये असणाऱ्या पथकाच्या श्वेता वलेकर यांनी मुलींचा शोध घेऊन त्यांना पकडले.
वाहनाला नंबरप्लेट नसल्याचे आढळल्याने दामिनी पथकाने तरुणींची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे परवाना (लायसन्स), वाहनाची आवश्यक कागदपत्रे, हेल्मेट नसल्याचे आढळून आले. चौकशी करताना तरुणींनी पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य भाषेमध्ये उत्तरे दिली नाहीत, असे दामिनी पथकाच्या कॉन्स्टेबल श्वेता वलेकर यांनी दै.”प्रभात’शी बोलताना नमूद केले. दरम्यान, तरुणींना नंतर समज देऊन आणि वाहतूक नियमानुसार दंड वसूल करून सोडून देण्यात आले.