पुणे – साडेपाच हजार लेझीम निकृष्ट दर्जाचे

प्रकरणाची चौकशी करून ठेकेदाराकडून बदलून घेण्याची मागणी

पुणे – जिल्हा परिषदेच्या शाळांना वाटप करण्यात आलेल्या लेझीमधील तब्बल साडेपाच हजार लेझीम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या ठेकेदाराकडून लेझीमचा पुरवठा करण्यात आला, त्यांच्यावर शिक्षण विभागाकडून काय कारवाई होणार, त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार का? याकडे सर्व सदस्यांचे लक्ष लागून राहिले असून या प्रकरणावरून सदस्य आक्रमक झाले आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळांना लेझीम वाटप करण्यात आले. त्याबाबत मालेगाव येथील गौरी आर्टस या एजन्सीला लेझीम पुरवठ्याबाबत ठेका देण्यात आला. त्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, या ठेकेदाराने शाळांना निकृष्ट दर्जाचे लेझीम पुरवठा केल्याचा आरोप भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे लेझीम बदलून घ्यावे आणि तोपर्यंत त्याचे बील देऊ नये, असे आदेश अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिले होते.

दरम्यान, शिक्षण विभागाकडून लेझीम चांगले असून जे लेझीम खराब असतील तर ते बदलून देऊ असे सभागृहात सांगितले. त्यावर सदस्य चिडले आणि तुम्ही ठेकेदाराला पाठीशी का घालता, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर मागील तीन महिन्यांत बहुतांश शाळांनी लेझीम खराब असल्याचे सांगून ते बदलण्याबाबत प्रस्ताव पाठविला. त्यानुसार शिक्षण विभागाकडून आतापर्यंत 5 हजार 547 लेझीम बदलून देण्यात आले आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की, ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे लेझीम पुरवठा करण्यात आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्‍यातील शाळांमध्ये 149 लेझीम बदलून देण्यात आले. तर भोरमध्ये 280, दौंडला 1 हजार 956, इंदापूरमध्ये 363, जुन्नर येथे 24, खेडमध्ये 1 हजार 257, मावळ 185, मुळशी 290, पुरंदर 239 आणि शिरूरमध्ये 804 लेझीम बदलून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.