पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे-मळवली, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर या स्थानकांदरम्यान तिकीट तपासणी करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांमध्ये केलेल्या तपासणीत तब्बल 4 कोटी 8 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
दिवसेंदिवस रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रेल्वेने एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण 74 हजार 535 घटनांमध्ये 4 कोटी 8 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. यापैकी 33 हजार 503 जण विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून 2 कोटी 10 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
पुणे विभागाचे मंडल रेल प्रबंधक मिलिंद देऊस्कर आणि अपर मंडल रेल प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने करण्यात आली. त्याचबरोबर विनातिकीट प्रवास न करण्याचे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
166 प्रवाशांवर कारवाई
तिकीट तपासणी अभियानांतर्गत नुकतीच निजामुद्दीन वास्को द गामा गोवा एक्स्प्रेसमध्ये कारवाई करण्यात आली. या गाडीतून मथुरा ते गोवा प्रवास करणाऱ्या 166 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एस.एस.एंजेलो, जी.एस. जाधव, अरूण एस. कुमार, राजेंद्र बिंद यांच्या पथकाने मनमाड ते पुणे स्थानकादरम्यान ही कारवाई केली.
विनातिकीट प्रवास केल्यास दंडाची तरतूद
तिकिटाच्या रकमेसह कमीत कमी 250 रुपये दंड
तिकिटाच्या पटीत अतिरिक्त दंड
दंड न भरल्यास कारावासाच्या शिक्षेची शक्यता