41000वर भरारी ः गुंतवणूकदार 1 लाख कोटींनी मालामाल!
मुंबई : जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर सकारात्मक संकेतांनी शुक्रवारी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात चौफेर खरेदी केली. दिवसभरत 450 अंकांची झेप घेणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बाजार बंद होताना 428 अंकांनी वधारून 41009.71 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 115 अंकांनी वधारला आणि 12086.70 अंकांवर बंद झाला. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान एक लाख कोटींची भर घातली.
मेटल, ऑटो, बॅंका, आयटी रियल्टी, बॅंकेक्स , एनर्जी, टेक, इन्फ्रा या क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. ज्यात बॅंकिग क्षेत्रातील युनियन बॅंक, कॉर्पोरेशन बॅंक, सेंट्रल बॅंक, एसबीआय, ऍक्सिस आदी शेअर तेजीसह वाढले. झी एंटरटेनमेंट , जैन इरिगेशन, गोदरेज प्रॉपर्टीज, महिंद्रा हॉलिडे, जिंदाल स्टील, बिर्ला कॉर्प, ब्रिटानिया, ग्लेनमार्क, टायटन, जे.के सिमेंट, सन टीव्ही या शेअरमध्ये घसरण झाली.
आजच्या तेजीने गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी वाढल्याचा अंदाज शेअर दलालांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी 27 नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स 41 हजार अंकांवर बंद झाला होता.