- विद्युत विभाग प्रमुख आणि सहशहर अभियंत्याचे आयुक्तांना पत्र
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्युत विभागाचे प्रमुख आणि सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देऊन राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अतिरिक्त आयुक्त पदावर बढती मिळत नसल्याने आणि वारंवार डावलले जात असल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात स्थानिक अधिकाऱ्यांमधील वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरलेले आहे. तर, राजकीय हितसंबध असलेल्या अधिकाऱ्यांबाबत वारंवार उलटसुलट चर्चा होत असते. महापालिका प्रशासनात बढत्यांवरून होणारे वाद राजकीय व न्यायालयीन लढाईपर्यंत गेले आहेत. त्यातच महापालिका विद्युत विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व प्रशासन विभागाला पत्राद्वारे राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे.
प्रवीण तुपे यांनी या पत्राद्वारे आपल्यानंतर महापालिका सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावर बढती मिळाली. ते निवृत्तही झाले, तरी देखील आपण एकाच पदावर आहोत. वारंवार आपल्याला डावलले जात आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्तपदी आपण पात्र असताना देखील बढती मिळत नसल्याचे सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली.
प्रवीण तुपे हे महापालिकेतील जुने वरिष्ठ अधिकारी आहेत. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबध आहेत. तरी देखील त्यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसल्याने चर्चा होत आहे. या सगळ्यामागचे नेमके कारण काय, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दरम्यान, प्रवीण तुपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.