- खासदार डॉ. कोल्हेंची टीका : ठेकेदारांना पोसण्याचा धंदा केल्याचा आरोप
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. प्रत्येक निविदेमध्ये काहीतरी गोलमाल आहे. वाढीव दराची कंत्राटे काढत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे, असा हल्लाबोल शिरुरचे लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी महापालिकेतील गैरकारभारावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेतील जे काही कंत्राट निघत आहे, त्यामध्ये गोलमाल आहे. गेली तीन वर्ष महापालिकेत भाजप सत्तेत येण्यापूर्वी आरडाओरड करत होते. त्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर बोकाळल्या आहेत. प्रत्येक निविदेमध्ये काहीतरी गोंधळ आहे. निविदेच्या अटी शर्ती बदलल्या जात आहेत. शहरवासीयांच्या कररुपी पैशातून नको त्या व्यक्तींना ठेका दिला जात आहे. जाणूनबुजून वाढीव दरांने कंत्राट काढले जात आहे. त्यामध्ये फक्त ठेकेदारांना पोसण्याचा धंदा केला जात आहे. इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा भाजपाने स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
महिलांवरील वाढत्या अत्याचाबाबत भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये धरणे आंदोलन केले जात आहे. त्याबाबत विचारले असता, डॉ. कोल्हे म्हणाले, महिलांवरील वाढते अत्याचार दुर्देवी आहेत. ते रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र भाजपने मागील पाच वर्षांचा लेखा जोखा समोर मांडला तर त्यांना आपण कशाबद्दल आंदोलन करत आहे, याबाबत सभ्रंम पडेल. त्यामुळे भाजपने दुसऱ्यांना शिकविण्यापेक्षा स्वतः विचार करावा अशी टीका खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केली.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत सोमवारी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला आहे. ठराविक लोकांच्या म्हणण्यानुसार जर गोष्टी होत असतील, तर त्यामध्ये अस्वस्थता येते. मात्र अस्वस्थतेला या पद्धतीने वाट मिळणे दुर्देवी आहे. परंतु ही वाट कशी निर्माण झाली, असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांच्या मनात का निर्माण होते. याचा विचार राज्यकर्त्यांनी कऱणे आवश्यक आहे.