नवी दिल्ली – फेसबुकडून ग्राहकांचा डाटा बेकायदेशीरपणे मिळवून त्याचा वापर केल्याच्या आरोपावरून सीबीआयने ब्रिटन मधील केम्ब्रिज ऍनॅलीटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च लि या कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील प्राथमिक तपासानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, ग्लोबल सायन्स रिसर्च लि कंपनीने धिस ईज युवक डिजीटललाईफ नावाचे एक स्वतंत्र ऍप स्थापन केले आणि त्यांना फेसबुकवरील डाटा अनाधिकृतपणे वापरण्याची अनुमती देण्यात आली. सन 2014 मध्ये त्यांनी या ऍप साठी संशोधन व शैक्षणिक प्रकल्पासाठी हा डाटा मागवला होता. त्यानंतर ग्लोबल कंपनीने केम्ब्रिज ऍनॅलीटिका कंपनीशी करार करून त्यांना हा डाटा वापरण्यास अनुमती दिली होती असे तपासात निष्पन्न झाले आहे.
हा प्रकार उघडकीला आल्यानंतर फेसबुकने या दोन्ही कंपन्यांना फेसबुक कडून मिळवलेला डाटा नष्ट करण्याची सूचना केली आणि तसे सर्टिफिकेट त्यांना सादर करण्यात सांगितले होते. त्यानुसार सन 2016-17 साली त्यांनी तसा डाटा नष्ट करून सर्टिफिकेट सादर केल्याचे सांगण्यात येते पण सीबीआयला मात्र तसा कोणताहीं अधिकृत पुरावा त्यांच्या चौकशीत मिळाला नाही त्यामुळे त्यांनी हा गुन्हा दाखल केला. हे आरोप प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.