पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी करोनाचे आणखी सहा रुग्ण आढळले. त्यामुळे आत्तापर्यंत करोनाबाधितांची एकूण संख्या 21 वर गेली आहे. त्यापैकी 12 जण करोनामुक्त झाले आहेत. मात्र, नव्याने रुग्ण आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. करोनावर मात करण्यासाठी संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तरीदेखील अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येतात. शनिवारी पोलिसांनी तब्बल 180 जणांवर संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. आत्तापर्यंत बारोशहून अधिक जणांवर प्रशासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भा. द. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोकाट फिरणाऱ्यांवर अंकुश बसावा म्हणून प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना रस्त्यावर येण्यास मनाई केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना इंधन बंद केले आहे. तरीदेखील काही टवाळखोर रस्त्याने फिरताना दिसतात. करोना रुग्णांची संख्या वाढल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.