पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर घरात अडकून पडलेल्या व काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन नसणाऱ्या शहरातील गरीब, गरजू, दिव्यांग, कामगारांसह ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महापालिका घरपोच “भोजन’ सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.
याबाबत पवार यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, करोनाच्या साथीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या नागरिकांना दिलासा मिळावा व भोजनाची सोय व्हावी या उद्देशाने जनकल्याण समिती व काळभैरवनाथ उत्सव समितीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत मोफत घरपोच भोजन पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेची सुरुवात सोमवार दि. 6 एप्रिलपासून करण्यात येणार असून, ज्या व्यक्तींना भोजनाची आवश्यकता असेल त्यांनी चिंचवड (9552578726), भोसरी (8605722777), आकुर्डी (8605422888) व पिंपळे सौदागर परिसरातील व्यक्तींनी (7887868555) या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जे दानशूर व्यक्ती शिधा अथवा जेवण दान करू इच्छितात त्यांनी ओंकार गौरीधारी (9372937598) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.