नवी दिल्ली – अयोध्येतील राम जन्मभूमी – बाबरी मशिदीचा जागेशी संबंधित असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात उद्या (दि. 10) रोजी सुनावणी होणार आहे. या संदर्भातील नोटीस सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नझीर यांच्या घटनापिठापुढे ही सुनावणी होणार आहे.
यापूर्वी 8 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मध्यस्थांच्या मार्फत सोडवण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एफ.एम.खालिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सर्वमान्य तडजोड शोधण्याचे निर्देश देण्यात आले होते. अध्यात्मिक गुरू आणि “आर्ट ऑफ लिव्हींग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर आणि वरिष्ठ विधीज्ञ श्रीराम पंछू यांच्यासह अन्य दोन प्रसिद्ध मध्यस्थांचे पॅनेल त्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. या पॅनेलने सर्व संबंधितांशी 8 आठवड्यांमध्ये चर्चा करून सर्वमान्य तोडगा देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती.