विक्रीमुळे शेअरबाजारात पडझड सुरूच

सात दिवसांत सेन्सेक्‍स 1472 अंकांनी कोसळला

मुंबई  -देशातील आणि परदेशातील परिस्थिती नकारात्मक असल्यामुळे भारतीय शेअरबाजाराच्या निर्देशांकांची पडझड चालूच आहे.आज सलग सातव्या दिवशी शेअरबाजाराचे निर्देशांक कमी झाले.

रुपयाचे मूल्य घसरू लागल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारही भारतातील गुंतवणूक कमी करीत आहेत. गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 230 अंकांनी 0.61 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 37,558 या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 57 अंकांनी कमी होऊन 11,301 अंकांवर
बंद झाला.

गेल्या सात दिवसांत सेन्सेक्‍स 3.77 टक्‍क्‍यांनी म्हणजे 1472 अंकांनी तर निफ्टी 446 अंकांनी कमी झाला आहे, गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर कोसळत आहे. आजही या कंपनीचा शेअर 3.41 टक्‍क्‍यांनी कोसळला. जागतिक शेअरबाजारातही आज अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धामुळे नकारात्मक वातावरण होते. शुक्रवारी या संबंधात अमेरिका आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. त्यानंतर देशातील आणि परदेशातील शेअरबाजारांना दिशा मिळण्याची शक्‍यता आहे.

गुरुवारी ऊर्जा, दूरसंचार, वीज बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक 2.63 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. तर तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व रिऍल्टी क्षेत्राचे निर्देशांक 0.44 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप गुरुवारी कमी झाले. बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 701 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी विक्री केली तर देशातील संस्था गुंतवणूकदारांनी 232 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा
प्रयत्न केला.

“गेल्या महिन्यात नकारात्मक जागतिक वातावरणामुळे भारतीय शेअरबाजार निर्देशांक कमी झाले आहेत. चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापाराबाबत शुक्रवारी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर भारतातील निवडणुका चालू आहेत. या कारणामुळे शेअरबाजारात नकारात्मक वातावरण रेंगाळले आहे.
-हेमांग जानी, संशोधन प्रमुख, शेअर खान

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.