न्यूयॉर्क : फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री अचानक बंद पडल्याने भारतासह जगभरातील कोट्यवधी युझर्सला याचा फटका बसला . इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत. मात्र यातून झुकरबर्गला मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीची आकडेवारी पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा खंडित झाली होती. तांत्रिक बिघाडीचे नेमके कारण मात्र उघड झालेले नाही. ‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला. नवे संदेश मिळत नसल्याची तक्रार लाखो वापरकर्त्यांनी केली.
सहा तास फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप बंद होतं. यामुळे फेबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याला तब्बल 44 हजार कोटी रुपयांचं अर्थात ६०० कोटी डॉलर्सचं नुकसान झालं. तर फेसबुकच्या शेअर्समध्ये देखील 4.9 टक्क्यांनी घसरण झाली. तर श्रीमंतांच्या यादीत मार्क झुकरबर्गची एका स्थानाने घसरण झाली आहे.