नवी दिल्ली – भारतात असलेले उद्योजकीय चैतन्य आणि भारतातील संधींची संख्या पाहता आपण भारतात डिजिटल अर्थव्यवस्था विकसित होण्याबाबत कमालीचे आशावादी आहोत असे मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
फेसबुक या कंपनीचे नामांतर मेटा असे करण्यात आलेले आहे. मेटा कंपनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना झुकरबर्ग म्हणाले की, भारत डिजिटल अर्थव्यवस्थेत जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
भारतामध्ये विविध क्षेत्रासाठी हुशार मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप साठी भारतामध्ये पूरक परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.
भारतामध्ये ऍप विकसित करणाऱ्यांची संख्या वेगात वाढत असून 2024 मध्ये भारतात सर्वात जास्त ऍप तयार होतील. भारतामध्ये गेमिंग ऍप विकसित करण्यासही फेसबूक कंपनी चालना देणार आहे. ते म्हणाले की, आगामी काळात फेसबुकची मेटाव्हर्स ही संकल्पना मोबाईल इंटरनेटची जागा घेणार आहे.
ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी इतर कंपन्यांची मदत लागणार आहे. त्यामुळे भारतातील मनुष्यबळ यासाठी उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेटा भारतामध्ये शिक्षण आणि ई-कॉमर्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे.
जागतिक विकासात भारताचा वाटा वाढणार असल्यामुळे आम्ही भारतावर लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.