नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या राजश्री घुले व कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली. आता जिल्हा परिषद समित्यांच्या सभापती निवडी मंगळवारी ,दि.14 रोजी होणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी विशेष सभा बोलविली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस,इंदिरा कॉंग्रेस,शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्ष या चार पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार समित्या दिल्या जाणार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल मुंबईत झाली असून आज पुन्हा स्थानिक नेत्यांची नगरमध्ये बैठक झाली.
राष्ट्रवादी व कॉंग्रेसला अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपद देण्यात आले.त्याचबरोबर महाविकास आघाडीतील चारही पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार विषय समित्या दिल्या जाणार आहेत. मागील अडीच वर्षात कॉग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन समित्या होत्या. यावेळी सत्तेची समीकरणे बदलली आहेत. राज्यात महाविकास आघाडी झाल्यामुळे जिल्ह्यातही हा प्रयोग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत करण्यात आला. त्यातून शिवसेनेने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाधिकारी निवडीपूर्वी क्रांतीकारी शेतकरी पक्ष आमचा सहयोगी असून आमचे सात व त्यांचे पाच असे बारा सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला उपाध्यक्षपद व अर्थ,बांधकाम समिती द्या अशी मागणी केली होती.
मात्र उपाध्यक्षपद कॉंग्रेसला देण्यात आल्याने आता अर्थ समितीवर शिवसेनेची नजर आहे. शिवसेनेकडून या समितीसाठी संदेश कार्ले वा गटनेते अनिल कराळे यांची वर्णी लागु शकते. क्रांतिकारी शेतकरी पक्षालाही अर्थ,बांधकाम समिती गटनेते सुनील गडाख यांच्यासाठी हवी आहे. पण ती सेनेला देवून गडाख यांना कृषी व पशुसंवर्धन समिती दिली जाईल असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे.
महिला व बालकल्याण समिती कॉंग्रेसकडे राहणार असून त्या जागेवर संगमनेरच्या थोरात समर्थक मीराताई शेटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर समाजकल्याण समिती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असून तेथे पुन्हा विद्यमान सभापती उमेश परिहर इच्छुक आहेत. त्याचबरोबर कोपरगावच्या आमदार आशुतोष काळे समर्थक सोनाली उबाळे यांचाही या समितीसाठी विचार होवू शकतो.
दरम्यान, महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध होणार हे निश्चित आहे. मात्र,भाजप व विखे गट महाविकास आघाडीत सुरु असलेल्या रस्सीखेचाच्या खेळात आपले उमेदवार देऊन लढतीत रंगत आणणार का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. भाजप व विखे गटाने सभापती निवडीत उमेदवार दिले तर या विषय समित्यांच्या निवडीत रंग भरला जावू शकतो. मात्र, वरिष्ठ पातळीवर व नंतर स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेत महाविकास आघाडीत सहभागी असलेले नगर जिल्ह्यातील प्रमुख चार पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतीकारी शेतकरी पक्षाला एक-एक समिती देण्याचे निश्चित झाले आहे. कुणाला कोणती समिती हेही जवळपास ठरलेले आहे. केवळ आधीच समित्या वाटपावरून इच्छुकांची नाराजी नको म्हणून जिल्हा परिषदेत नेमलेली समन्वय समिती ऐनवेळी म्हणजेच उद्या सकाळीच विषय समित्यांच्या सभापतींच्या नावाची घोषणा करणार आहे.