झाकिर नाईकच्या भाषणांमुळे दहशतवादी गटाला प्रेरणा

महाप्रसादात विष मिसळून सामुहिक हिंसा करण्याचा होता कट
“एटीएस’च्या आरोपपत्रामधील धक्कादायक माहिती

मुंबई: हिंदू मंदिरांवर हल्ले आणि सामूहिक हत्याकांड घडवून आणण्याच्या कटाबद्दल यावर्षी जानेवारी महिन्यात अटक केलेल्या गटाला वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झाकिर नाईकच्या भाषणांमधून प्रेरणा मिळाली होती, असे दहशतवाद विरोधी पथकाने म्हटले आहे. इस्लामिक स्टेटपासून प्रेरणा घेतलेल्या या गटाविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये “एटीएस’ने हा उल्लेख केला आहे.

अटक केलेल्या गटाने मंदिरांमधील महाप्रसादामध्ये विष मिसळण्याचा प्रयत्न केला होता. स्फोटके आणि विषारी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही या गटाने घेतले होते. ठाणे जिल्ह्यात मुंबई बायपास जवळच्या टेकडीवर घेतलेल्या स्फोटकांच्या चाचण्यांमध्येही हा गट सहभागी झाला होता, असे “एटीएस’ने म्हटले आहे.

मुंब्रा आणि औरंगाबादमधील इस्लामिक स्टेटशी संबंधित गटाशी संबंध असल्याच्या संशयावरून यावर्षी जानेवारीमध्ये “एटीएस’ने “उम्मत ए मोहम्मदिया’ या गटाच्या 10 जणांना अटक केली होती. विषारी पदार्थांद्वारे मोठी जिवीतहानी करण्याचा या गटाचा कट “एटीएस’ने उधळून लावला होता. या गटाबाबत तपशीलवार तपास केल्यावर “एटीएस’ने मुबईतल्या न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मनी लॉंडरिंग प्रकरणी आरोपपत्र ठेवण्यात आलेला इस्लामी व्याख्याता झाकिर नाईकच्या भाषणांमधून या गटाने प्रेरणा घेतली असल्याचे “एटीएस’ने आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपींच्या सोशल मिडीया अकाउंटवर झाकिर नाईकच्या काही भाषणांचे व्हिडीओ आणि फोटोही सापडले आहेत. मुंब्रा येथील मुंब्रेश्‍वर मंदिरातील महाप्रसादात विष मिसळून सामुहिक हत्या करण्याचा कट या गटाने केला होता. डिसेंबर महिन्यात या मंदिरात श्रीमद्‌भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला होता. त्यावेळी आरोपींपैकी ताहला पोट्रीक याने महाप्रसादामध्ये विष मिसळण्याचा प्रयत्न केला होता, असे “एटीएस’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

स्फोटके आणि विष तयार करण्याची माहिती या गटाने इंटरनेटवरून मिळवली आणि स्फोटकांची चाचणीही घेतली होती. अटक केलेले काही आरोपी मुंब्य्रातील स्टेडियममधील प्रशिक्षणातही भाग घेतला होता. काही विदेशी हस्तकांशीही काही जण संपर्कात होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)