संगमनेर, (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या नूतन अध्यक्षा कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तालुक्यातील 2500 महिलांनी सहभाग घेतला. वडगाव लांडगा येथील 65 वर्षीय सुमन बाळासाहेब लांडगे यांनी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात आपले कौशल्य दाखवताना या स्पर्धेचा आनंद घेतला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 65 वर्षीय आजी मैदानात उतरतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. वडगाव लांडगा विरुद्ध पिंपळगाव या संघामध्ये पाच शटकांची मॅच झाली. यामध्ये प्रथम वडगाव लांडगाकडून सलामीसाठी आजीबाइ सुमन लांडगे मैदानात येतात. उपस्थित सर्व महिला व मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आजींनी पहिला बॉल अत्यंत सुंदर खेळून काढला तर दुसऱ्या बॉलवर दोन रन काढून संघाची सुरुवात केली. पुन्हा दोन बॉल खेळून काढल्यानंतर सहाव्या बॉलवर खणखणीत चौकार मारला. 65 व्या वर्षी अत्यंत तंदुरुस्तीने व आनंदाने मैदानात उतरताना सर्व युवतींना प्रोत्साहित केले.
पाच षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावसंख्येवर पिंपळगाव कोंझिरा संघाला आव्हान दिले. या खेळात पिंपळगाव कोंजीरा संघ विजयी झाला. मात्र, आजीच्या सहभागाने हा संघ सर्वांची मने जिंकून गेला. सर्व विजेत्या संघांसह सुमन लांडगे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.