नांदेड – नांदेडमध्ये (Nanded) मराठा आरक्षणसाठी (Maratha reservation) एका उपोषणकर्त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या उपोषणकर्त्याचे नाव सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय-कामारीकर असे असून त्यांनी रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर संपूर्ण नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवसानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडले.
दरम्यान, सुदर्शन हा गावातील काही सहका-यांसोबत उपोषणाला बसलेला होता. गेल्या दोन दिवसांपासून सुदर्शनचे उपोषण सुरू होते. मराठा आरक्षण मिळत नसल्याने सुदर्शनने रविवारी रात्री गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुदर्शनने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. यात सुदर्शनने लिहिले की, मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केल्यानंतर सुदर्शनचा मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.