जीवनगाणे: तू माऊली हो…

अरुण गोखले

“तू फक्‍त माय नको तर माऊली हो’ या सिंधूताईंना त्यावेळी मिळालेल्या आशीर्वादाचा खरा अर्थ त्यांना आज उमगला होता. आज समाजाने त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत त्यांना एका विशेष “अनाथांची माऊली’ या सन्मानाने सन्मानित केले होते.

आजच्या अध्यक्षीय भाषणात “सुजनहो! सिंधूताईंचे कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेले सामाजिक परिवर्तन, त्यांनी हजारो मुलां-मुलींच्या जीवनात लावलेल्या ज्ञानज्योती, त्यांना उघडी करून दिलेली नव क्षितिजांची दारे… त्यांचा जीवनाला दिलेला आकार, हे कार्य पाहताना मोठ्या कृतज्ञतेने हेच म्हणावे लागेल की सिंधूताई या केवळ माय नाहीत तर त्या माऊली आहेत. असं माऊलीपण असत संतांकडे… देवाकडे… ज्ञानदेवांनी सकल विश्‍व कल्याणासाठी त्या जगदिश्‍वराकडे अक्षय असे पसायदान मागितले, म्हणूनच ते माऊली या पदास पात्र झाले.

पंढरीच्या विठुरायाला माऊली म्हणून संबोधतात, कारण त्याला सारी लेकरं ही सारखीच आहेत. तो विशाल अंत:करणाने सर्वांचे पालन पोषण करीत, आपले माऊलीपण सिद्ध करीत असतो. मातेच्या ममतेच्या प्रेमबिंदूचा जेव्हा सिंधू होतो तेव्हाच ती मायमाऊली होते.

माय होणे सोपे आहे, पण माऊली होण्यासाठी मात्र फार मोठे मन असावं लागतं. रक्‍ताची नसलेली नाती मायेनं जोडण्याचं कसब अंगी असावं लागतं, सिंधूताईंकडे ते आहे. म्हणूनच त्यांनी आपलं कार्यक्षेत्र हे मी, आणि माझं घर इतकं संकुचित ठेवले नाही. त्यांनी सभोवतीच्या अनेक अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम काढले, उपेक्षित समाजातील मुलांसाठी शाळा काढल्या. मुला-मुलींच्या हाती शेणाची पाटी न देता अक्षरांची पाटी दिली. ज्ञानाच्या ज्योती लावून त्यांच्या जीवनातला अज्ञानाचा अंधार दूर केला.

आज त्या असंख्य मुलांच्या माऊली पदावर अधिष्टीत आहेत. त्यांनी वात्सल्याचे, प्रेमाचे, सहकार्याचे, सहानूभुतेचे, हात पसरून एक बरंच मोठं विश्‍व त्यांच्या कवेत घेतले आहे. हे असे व्यापक कार्य एक माऊलीच करू शकते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आजच्या या विशेष “अनाथांची माऊली’ या सन्मानाने सन्मानित करत असताना मला विशेष आनंद होत आहे’.
त्या भाषणातला प्रत्येक शब्द त्यांना आज माऊली या शब्दाचा विस्तारित अर्थ सांगत होता. आपण ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत त्या आशीर्वादाच्या बळावर माय या पदावरून माऊली या पदावर पोहोचल्याचा आनंद त्यांच्या मनात एक समाधानाचे जीवनगाणे गात होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)