पुणे- तंग कपडे घातल्याच्या रागातून दोन तरुणींना चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार शहराच्या खराडी उपनगरात घडला. “मॉरल पोलिसिंग’च्या या धक्कादायक घटनेने शहर आवाक् झाले असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही मुली परप्रांतीय असून या घटनेने शहराची सहिष्णू प्रतीमाच मलीन झाल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत.
खराडीमध्ये एका सदनिकेत माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील दोन युवती भाडेतत्वावर राहात आहेत. त्या कंपनीतील वातावरणामुळे तंग कपडे परिधान करत असत. सोसायटीत वावरताना त्याच कपड्यात वावरत असल्याचे मारहाण करणाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांच्या सदनिकेत शिरून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. शिविगाळ करण्यास त्या तरुणींनी विरोध करताच त्यांना चपला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करण्यात आली. सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे यांच्यासह अन्य तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्योती संजय येळे (रा. लेक्सीस सोसायटी, अनुसया पार्क, रक्षकनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येळे यांची लेक्सीस सोसायटीत सदनिका आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या दोन युवती येळे यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी पठारे याच सोसायटीत राहायला आहेत. दरम्यान, येळे आणि पठारे यांच्यातील व्यक्तिगत जुन्या किरकोळ वदातून ही घडल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला आहे. या आरोपींना अद्याप अटक केली नसली तरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील, असे पोलीस सांगत आहेत.
फिर्यादीतून…
येळे यांच्याकडे राहणाऱ्या युवती मूळच्या परराज्यातील आहेत. युवती सोसायटीच्या आवारात तंग कपडे परिधान करून ये-जा करत असतात. त्याचा रहिवाशांना त्रास होत असल्याचे आरोप करत पठारे दोन दिवसांपूर्वी रात्री युवती राहात असलेल्या सदनिकेत शिरले. त्यांना शिवीगाळ केली. युवतींना चपलेने मारहाण केली तसेच येळे यांना धमकावले, असे येळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे तपास करत आहेत.