लोणी काळभोर – सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री वाढवून पिण्याच्या पाण्यात व ज्यूसमध्ये अंमली पदार्थ टाकून एका युवतीवर चार महिने बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वीस वर्षीय पीडित तरुणी पुण्यात राहत आहे. यासंदर्भात गौरव ऊर्फ मुन्ना संजय तरवडे (रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) याच्याविरोधात पुणे शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे त्यांच्याकडे वर्ग केला आहे. पीडित तरुणी एका कामासाठी पुण्यातील एका पोलीस ठाण्यात गेली असता तेथे तिची ओळख मुन्ना याच्याशी झाली.
दरम्यान दोघांच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क वाढून त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. लॉजमध्ये त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर त्याचे लग्न झाले असून तो अंमली पदार्थांचे सेवन करतो अशी माहिती तरुणीला मिळाली. त्याच्याशी संबंध तोडण्याबाबत तिने त्याला सांगितले.
मुन्नाने तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. मात्र तरीही त्याने तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याशी संबंध सुरुच ठेवले. यादरम्यान तिच्या पिण्याच्या पाण्यात व ज्यूसमध्ये अंमली पदार्थ टाकून तिच्यावर बलात्कार करत होता.