व्रत-उपासनासंसार-प्रपंच करीत असताना माणसाला हवी असणारी धनसंपत्ती, पैसा-आडका, घरदार, नोकरी, व्यवसाय, शिक्षण इ. गोष्टी मिळविण्यासाठी तुम्ही आम्ही, प्रत्येकजण प्रामाणिक प्रयत्न हे करीत असतो. पण या गोष्टी आवश्यक असूनही त्या सर्वांनाच सारख्या आणि पुरेशा प्रमाणात मिळतातच असे होत नाही.
हे असे का होते? ह्याचा विचार केला तर असे लक्षात येते की आपल्या मानवी प्रयत्नांना कुठेतरी ईश्वरी कृपेची जोड मिळालेली नसते. त्यामुळेच केलेल्या प्रयत्नांचे हवे तसे फळ आपल्याला मिळालेले नाही.
या आवश्यक असणाऱ्या ईश्वरी कृपेच्या लाभासाठी आपल्या संस्कृतीत अनेक प्रभावी आणि फलदायी व्रत वैकल्ये सांगून ठेवलेली आहेत. उदा. धनलाभासाठी श्री वैभव लक्ष्मी व्रत, मनोकामना पूर्तीसाठी श्री सत्यनारायणचे व्रत, संकटे, विघ्ने नाश होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वटपौर्णिमेचे किंवा मंगळागौरीचे व्रत इ.
या व्रत संदर्भात आपल्या मनात असे प्रश्न उभे राहतात की व्रत म्हणजे नेमके काय? आणि ही व्रते का करायची? तर त्या संदर्भात अधिकारी जाणकार व्यक्तींकडून जे उत्तर मिळते ते असे की एखाद्या देवतेची कृपा पाप्त होण्यासाठी, विशिष्ट पद्धत, वार, तिथी, दिवस, व्रत संदर्भात पाळावयाचे नियम लक्षात घेऊन केलेली श्रद्धायुक्त उपासना म्हणजे व्रत.
हे असे आचरण आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी, इच्छित ध्येय प्राप्ती होण्यासाठी, कार्य सिद्धीसाठी, आधि-व्याधी निवारण होण्यासाठी, भगवंताचा कृपाशीर्वाद लाभण्यासाठी पापांचा क्षय आणि पुण्याईची वृद्धी होण्यासाठी करायचे असते.
या व्रतांची माहिती देणाऱ्या व्रतकथा पुस्तकांची, पोथ्यांचीही सध्या सहज उपलब्धता आहे. व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीस ते व्रत आचरण केले असता ज्याप्रमाणे कथित लाभ होतो. त्या प्रमाणेच त्या व्यक्तीस एक मानसिक सुख आणि समाधान हे लाभत असते.
अशा व्रताचरणाने भक्त भाविकांच्या मनातील ईश्वर निष्ठा, भक्ती बळावत असते. या गोष्टी घडाव्यात म्हणूनच की काय या व्रतांना त्यांच्या प्रभावी कथांची जोड दिलेली असते. व्रतांच्या अशा छोट्या पोथ्यांमधून प्रत्येक व्रताचे महत्त्व, व्रताचरणाची पद्धत, पूजाविधी, आहार विहाराचे नियम, बंधने सांगितलेली असतात.
त्यांचे कसोशीने पालन करणे, ब्रह्मचर्य राखणे, शुचिता सांभाळणे हे बंधनकारक असते. व्रतांचे विविध प्रकार असून ते प्रामुख्याने मानवी कल्याणाच्या हेतूनेच पुरस्कृत करून ठेवलेले आहेत.
अरुण गोखले –