- शिरगाव येथे घटना
सोमाटणे – येथील पवना नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात दमछाक होऊन बुडला. रविवारी (दि. 10) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
सुधीर प्रभू गोपाळे (वय 38, रा शिरगाव, ता. मावळ) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील काही मुले रविवारी पोहण्यासाठी नदीवर पोहायला गेले. सुधीर गोपाळे याचा दमछाक होऊन तो पाण्यात बुडाला. त्याचवेळी काही तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही.
या घटनेची माहिती पोलीस पाटील समीर शेख यांनी शिरगाव पोलीस चौकीस कळवली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरूण संतोष गोपाळे, अक्षय गोपाळे, खंडू गोपाळे व अन्य तरुणांच्या मदतीने पोलिसांनी शोध घेतला असता सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मृतदेह आढळून आला. सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.