-ओंकार दळवी
जामखेड (प्रतिनिधी) : जगभरात “करोना’ थैमान घालत असताना जामखेड शहर मात्र “करोना’’ मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुरुवातीच्या काळात जिल्हात सर्वाधिक १७ रुग्ण सापडलेल्या जामखेड शहरात आता अवघे चार करोना बाधित रुग्ण उरले आहेत. सलग तेरा दिवशी एकही “करोना’बाधित रुग्ण आढळलेला नाही तर उर्वरित चार रुग्णांची प्रकृतीही स्थिर आहे. त्यांची उद्या तपासणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी यांनी जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून ६ मे पर्यंत जाहीर केले होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने याची मुदत चार दिवस वाढवून १० मे पर्यंत या हॉटस्पॉट मध्ये वाढ करण्यात आली. त्याची मुदत आज दि १० मे रोजी संपत असून गेल्या एक महिन्यापासून हॉटस्पॉट असलेल्या जामखेड शहरात नागरिकांचे हाल झाले ,मात्र प्रशासनाने उपाययोजनेमुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोलाची मदत झाली असून शहराची कोनोरोमुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे .
जामखेड शहरात २८ मार्च ते २६ एप्रिल या काळात शहरात १७ करोनाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र जिल्हाप्रशासनाने सलग एक महिना जामखेड शहर एकदम कडक हॉटस्पॉट केल्याने व स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांनी या साखळीला ब्रेक लावण्यात यश आले. १७ रुग्नापैकी १ जणांचा मृत्यु झाला असून १२ रुग्ण टप्प्याटप्प्याने बरे झाले. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश असून सध्या ते क्वॉरंटाइन मध्ये आहे. या १७ कोरोनाग्रतांच्या संपर्कात आलेल्या एकूण १५३ संशयितांची तपासणी तालुका आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती. तसेच या दरम्यान करोना’ विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आज अखेरपर्यंत ९ हजार ९९५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात आतापर्यंत १७ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मागील महिन्यातील १० एप्रिल पासून संपूर्ण जामखेड शहराचा परीसर दोन किलो मीटर अंतरापर्यंत हॉटस्पॉट घोषित केला होता. सुरुवातीला हे व्हॉटस्पॉट चार दिवसांसाठी जाहीर केले होते. पुन्हा १४ तारखेला या हॉटस्पॉटची मुदत वाढवून पुढील दहा दिवस म्हणजे २३ एप्रिलपर्यंत वाढवली होती. या दरम्यानच्या काळात १८ एप्रिल रोजी शहरातील एक वृद्धाचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
मृत व्यक्तीच्या संपर्कातील दोन मुलांसह एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत जिल्हाधिकारी यांनी १९ एप्रिलला आदेश काढून १ मे पर्यंत हॉटस्पॉट जाहीर केले होते. यात पुन्हा आदेश काढून ६ मे पर्यंत हॉटस्पॉट जाहीर केले होते. त्यामुळे काही अत्यावश्यक दुकाने उघडतील थोडी सवलत मिळेल मेडिकल दवाखाने उघडतील अशी आशा होती पण जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा आदेश काढून १० मे पर्यंत हॉटस्पॉट जाहीर केल्याने नागरिकांना जी आशा होती त्यावर मुदत वाढल्याने विरजण पडले.
शहरातील सर्व अत्यावश्यक दुकाने यामध्ये दवाखाने,मेडिकल,किराणा दुकाने बंद असल्याने नागरिकाचे प्रचंड हाल झाले, तरीही जामखेडकरांनी संयम राखत प्रशासनानाला सहकार्य केले आता दहा तारखेनंतर अकरा तारखेला तरी काही सवलत मिळेल या आशेवर जामखेडकर आहेत. कारण एक महिन्यापासून लोकांना हॉटस्पॉट मुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरीही जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, आवतारसिंग चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे या सात कर्त्यव्यदक्ष अधिकारी व त्यांच्या सर्व टीमने जामखेडकरांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर कोरोनाशी लढा दिला आहे.
त्याचे फलित म्हणूनच कोरोनाची साखळी तुटण्यास प्रशासनानला यश आले असून उद्या (दि 11मे) रोजी शहराच्या हॉटस्पॉटची मुदत संपत असून चौदा दिवस एकही रुग्ण न आढळल्याने हॉटस्पॉटमध्ये सवलत मिळेल या आशेवर सध्या जामखेडकर आहेत. त्यामुळे या व्हॉटस्पॉट मध्ये बदल करून नागरीकांना थोडी ढील देण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
हॉटस्पॉटमुळेच साखळी तुटण्यास मदत
जिल्हाधिकारी राहुल व्दिवेद्री यांनी जामखेड शहरात गेल्या एक महिन्यापासून होस्टस्पोट लागू केला होता. त्यामुळे सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले, मात्र प्रशासनाच्या या कठोर निर्णयांचा जामखेडकरांचा फायदाच झाला असून जामखेड तहसील प्रशासन, तालुका आरोग्य विभाग, जामखेड नगरपरिषद, पोलीस प्रशासनान यांच्या अथक प्रयत्नांनी कोरोनाची साखळी तुटण्यास मोलाची मदत झाली आहे. गेल्या १३ दिवसांपासून नव्याने एकही रुग्ण न आढळल्याने जामखेड शहराने कोरोनमुक्तीकडे वाटचाल केली आहे.