इस्लामपूर (प्रतिनिधी) जर्मनीहून मुंबईमार्गे वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे मामाच्या गावी आलेल्या तरुणांची माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. तो आठ दिवसांपूर्वी ‘जर्मनी’तून मुबंई येथे आला आहे. शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नेर्ले गावात आला. आजोळी आलेल्या परदेशी पाहुण्याची चाहूल लागताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जर्मनीहून आलेल्या तरुणाची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. नेमका प्रकार काय आहे. यासाठी सतर्क झालेल्या प्रशासनाने थेट नेर्ले येथे धाव घेतली.
परदेशातुन आला आहे म्हणजे त्या युवकाला कोरोना झालाच आहे या गैरसमजामुळे लोकांत चर्चा झाली. त्या तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत प्राथमिक तपासणी करीत ‘होम कोरंटाइन’ शिक्का मारला गेला. त्याला त्याच्या घरी जाण्याचा सल्ला दिला. नेर्ले येथे शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती लोकांत पसरली
अन् उलट सुलट चर्चा ही रंगली.
ग्रामपंचायत प्रशासनासह सदस्य व पोलीस यांनी नातेवाईकांनी त्या युवकास मार्गदर्शन केले. त्यामुळे तो युवक आपल्या घरी सुरक्षित मार्गस्थ झाला. तो २७ वर्षीय युवक जर्मनीत नोकरी करतो. मुंबईत त्याचे वृद्ध आई वडील आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी तो जर्मनीहून विमानाने मुंबईत आला.मुंबईत राहून तो नेर्ले येथे आज पहाटे आला होता. त्याला त्याच्या घरी जाण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय तपासणीनंतर तो मुबंईला रवाना झाला.