सौरभ गोखलेची सुजय डहाकेच्या व्यक्तव्यावर जळजळीत प्रतिक्रिया
मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने वैविध्यपूर्ण मराठी चित्रपट दिले आहेत. चार वर्षांच्या कालावधी नंतर सुजय त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा नवीन अफलातून भेट घेऊन आला. नुकतंच सुजयचा ‘केसरी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुजयने एका नामांकित मराठी वृत्तपत्रला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. “सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?” असा प्रश्न सुजयने विचारला आहे. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून, अनेक मराठी कलाकार यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेता ‘सौरभ गोखलेनंही यावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. सौरभनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं कि, “स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके… आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही…, पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी”. असं सौरभ म्हणाला.