तुम्ही सरकारमध्ये नाही, पत्र देऊन काय करणार

उपमुख्यमंत्री पवार यांची भाजपा नेत्यांच्या वक्‍तव्यावर टीका

पुणे -“अहो तुम्ही सरकारमध्ये नाही, त्यामुळे तुम्ही पत्र देऊन काय करणार’. सरकारमध्ये आहेत, त्यांनाच हा अधिकार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीमध्ये भाजपा नेत्यांनी केलेल्या वक्‍तव्यावर टीका केली. तुम्हाला पत्र द्यायचे तर अडविले कोणी, असेही पवार यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. दरम्यान, राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून त्याबाबत निवेदन दिले आहे. त्यावर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टोलेबाजी करत राज्यपालानांच निवेदन द्यायचे होते तर ते आम्हीही दिले असते.

त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पत्रकार परिषदेत विचारले असता, “सरकारमध्ये जे आहेत, त्यांनाच हा अधिकार आहे. वेळ पडली तर सरकार अधिवेशन बोलावून याबाबत ठराव करू शकतो. तुम्ही सरकारमध्ये नाही, तुम्ही पत्र देऊन काय करणार,’ असे सांगून भाजप नेत्यांना तुम्ही विरोधी पक्षात आहात याची आठवण करून दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आदेशामध्ये निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती आणि केंद्र सरकार यांच्याकडे जाण्याबाबत सांगितले. त्यानुसार राज्य आणि केंद्र यांच्यातील महत्त्वाची व्यक्‍ती म्हणून आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, असे पवार यांनी सांगितले.

…त्यासाठी खास वेळ घेणार
राज्यपालांच्या भेटीदरम्यान 12 आमदारांच्या निर्णयाबाबत विचारले का? असे अजित पवार यांना विचारताच त्यांनी “दादा’शैलीत, त्या 12 आमदारांची त्यांना आठवण करून दिली नाही. हा मराठा आरक्षाणाचा विषय होता, त्यामुळे विषयात विषय नको, म्हणून विचारले नाही. परंतु, त्यासाठी राज्यपालांची वेळ घेऊन त्या 12 आमदारांना बरोबर नेऊन त्याबाबत विचारणा करू, असे अजित पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.