लखनौ – ऑक्सिजनची मागणी देशभरातील अनेक रुग्णालयांकडून होत आहे. त्यातच ऑक्सिजन कमी पडल्यास रुग्णालयांकडून राज्यांना आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिली जात आहे. असे असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात तक्रार करणाऱ्या रुग्णालयांना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मात्र तंबी दिली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असला तरी त्याचा गाजावाजा करू नका. प्रसारमाध्यमांसमोर गाजावाजा केल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा योगी सरकारने रुग्णालयांना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील प्रशासनिक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानिरीक्षक यांच्यासोबत एक आढावा बैठक घेतली. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ज्या रुग्णालयांमधून रुग्णांना सोडून दिले जात आहे किंवा ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली जातेय त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
आमच्याकडे ऑक्सिजन नाही, अशी नोटीस लावणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई केली पाहिजे आणि रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले पाहिजे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुद्दाम रुग्णालयांकडून गोंधळ निर्माण करणारी, रुग्णांना घाबरवून टाकणारी परिस्थिती निर्माण केली जात आहे का, याची चौकशी केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
राज्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितले. प्रत्येक खासगी आणि सरकारी रुग्णलयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात राज्य सरकार काम करत आहे, पण ऑक्सिजनचा गैरवापर थांबवला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.