नवी दिल्ली – मागील एका वर्षांपासून जगभऱात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गाने भारताला जेरीस आणलं आहे. पहिल्या लाटेचा सामना यशस्वीरित्या करणाऱ्या भारतात करोनाच्या नवीन स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. भारतातील या नवीन स्ट्रेनने जगभरात चिंता निर्माण केली असताना हा स्ट्रेन तब्बल १७ देशांमध्ये पोहोचला असल्याचं समजतं.
भारतात दुसऱ्या लाटेत आढळलेला करोनाचा डबल म्युटंट व्हेरियंट 17 देशांमध्ये आढळला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंगळवारी म्हटल आहे. भारतात आढळलेल्या या व्हेरियंटला B.1.617 असं नाव देण्यात आलंय. हा व्हेरियंट सर्वात आधी भारतात आढळला होता. त्यानंतर GISAID ओपन-अॅक्सेस डेटाबेस वर अपलोड केलेल्या 1,200 पेक्षा जास्त सिक्वेंसमध्ये हा 17 देशात पसरल्याची माहिती मिळाली आहे.
डब्ल्यूएचओने म्हटलंयं की, GISAIDने केलेल्या सिक्वेंसिंगच्या आधारे भारतात इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत B.1.617 मुळे होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे ट्रान्समिशन वेगाने वाढू शकतं. अनेक रिसर्चमध्ये असं दिसून आलंय की पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार खूप जास्त वेगाने झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,60,960 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी एका दिवसांतून मृत्यूने 3293 चा आकडा पार केला आहे. ही बाब इतर देशांची चिंता वाढवणारी आहे.