नवी दिल्ली – येस बॅंकेच्या पुनर्ररचनेच्या संबंधात आम्ही सर्व पर्यायांची विचार करीत असून तेथील ठेवीदारांच्या हिताचे रक्षण केले जाईल, त्यांचा पैसा सुरक्षित राहील अशी ग्वाही केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम यांनी दिली आहे.
या बॅंकेच्या बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लागू करून योग्य उपाययोजना केली आहे असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी आज या स्थितीच्या संबंधात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली.
या बॅंकेच्या पुनरूज्जीवनासाठी जे जे काही करता येणे शक्य आहे त्या पर्यायांवर विचार केला जाईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. येस बॅंक आर्थिक अडचणीत आल्याने सध्या आर्थिक क्षेत्रावर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.