नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. या डबघाईला आलेल्या कंपनीत गुंतवण्यात आले आहेत. त्यामुळे या निधीचे 2267 कोटी रूपये बुडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या घोटाळ्याची सीबीआय मार्फत आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणात सुरूवातीला उत्तरप्रदेशातील हजरतगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तो एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या संस्थेने त्या प्रकरणाचा आता रितसर तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात उत्तरप्रदेश उर्जा क्षेत्रातील कर्मचारी संघटनेचे माजी सेक्रेटरी प्रविणकुमार गुप्ता, माजी आर्थिक संचालक सुधांशु त्रिवेदी, इत्यादींची नावे या एफआयआर मध्ये नोंदवण्यात आली आहेत. गुप्ता आणि त्रिवेदी यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यातच अटक करण्यात आली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीने आत्तापर्यंत 31 हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे सांगितले जात आहे. त्यात उत्तरप्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांची 2267 कोटी रूपयांचीही रक्कम अडकली आहे.