यवतमाळ : रक्त संकलन वाहिनीमुळे जिल्‍ह्यात रक्तसाठा वाढेल – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : जिल्ह्यात दरवर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. रक्तदान करणाऱ्यांची जिल्ह्यात कमतरता नाही. मात्र ग्रामीण भागातील अनेक रक्तदाते शहरात येऊन रक्तदान करू शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वन विभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रक्त संकलन वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्तसाठा वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संकलन वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.  जिल्ह्यात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्र वनविकास महामंडळाने रक्तसंकलनासाठी हे सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही रक्त संकलन वाहिनी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करताना मनापासून आनंद होत आहे. जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त तसेच थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांना दरमहा रक्त द्यावे लागते. शिवाय अपघातग्रस्तांनाही रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळी जिल्ह्यात रक्ताचा मुबलक साठा असला पाहिजे. आतापर्यंत सामाजिक संघटना व आरोग्य यंत्रणेच्या वतीने शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन केले जात होते. भविष्यातही रक्तदान शिबिरे आयोजित असली तरी रक्त संकलन वाहिनीद्वारे मात्र ग्रामीण भागात थेट जाऊन इच्छुकांकडून रक्त संकलन करणे अतिशय सोपे झाले आहे. विशेष म्हणजे शिबिरासाठी येणारा खर्च व वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होईल. या वाहनात जनरेटर व्यवस्था लावण्यात आल्याने रक्त संकलनात अडथळा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी जिल्ह्याला रक्त संकलन वाहिनीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासंदर्भात आलेल्या पत्रावर लगेच वनमंत्री म्हणून शेरा मारला व महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे सदर पत्र कार्यवाहीसाठी पाठविले. त्यांनी लगेच होकार कळवून अत्यंत कमी कालावधीत सामाजिक दायित्व निधीतून हे वाहन उपलब्ध करून दिले. या रक्तसंकलन वाहिनीमध्ये एकावेळी दोन रक्तदाते रक्त देऊ शकतात. मात्र भविष्यात एकाचवेळी 10 ते 15 रक्तदाते रक्त देऊ शकेल, अशी मोठी बस उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना त्यांनी महामंडळाला दिल्या. या वाहनाची देखभाल व दुरुस्ती नियमित करावी. यात कुठेही खंड पडू देऊ नका, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, रक्त संकलनामध्ये गत तीन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अव्वल आहे. यावर्षीसुध्दा जास्तीत जास्त रक्त संकलन करा. जिल्ह्याचा भौगोलिक आकार बघता अशा प्रकारच्या आणखी एक-दोन वाहनांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, रक्त संकलन वाहिनी अद्ययावत सोयीसुविधांनी परीपूर्ण आहे. या वाहिनीची किंमत 26 लक्ष असून सहा व्यक्ती बसण्याची यात व्यवस्था आहे. दोन रक्तदाते एकाच वेळी या वाहिनीत रक्तदान करू शकतात. तसेच संकलित रक्ताच्या पिशव्या ठेवण्यासाठी 60 लिटरचा फ्रिज या वाहनात असून स्टाफसाठी बायोटॉयलेटची व्यवस्थासुध्दा आहे. सन 2018 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 123 शिबिरे घेऊन 14003 रक्त पिशव्या संकलित केल्या होत्या. 2019 मध्ये 128 शिबिराच्या माध्यमातून 13500 आणि 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी 142 शिबिराच्या माध्यमातून 9570 रक्त पिशवीचे संकलन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.