Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरूवात झाली असून राज्यासह देशभरात प्रचार सभांनाही वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांचेही राजकारण या काळात सुरूच आहे. अशातच कशाचीही तमा न बाळगता राजकीय नेते आपल्या प्रचारसभा घेतायतं. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता सर्वच राजकीयनेते प्रचार सभांना हजेरी लावत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याची घटना घडली होती आणि आज यवतमाळच्या पुसद येथे देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला.
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज यवतमाळच्या पुसद येथे आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या आयोजनानुसार नितीन गडकरी भाषणासाठी आले आता त्यांना अचानक भोवळ आल्याचे कळताच त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना मंचावरून बाजूला नेले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळते आहे.
या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना उन्हामुळे भोवळ आल्याची घटना घडली आहे.
यापूर्वीही अनेकदा आलीय भोवळ
1. नोव्हेंबर 2022 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमामध्ये भोवळ आली होती. बंगालमधील सिलिगुडतील दागापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली. भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आली होती. त्यांच्यावर तात्काल प्राथमिक उपचार करण्यात आले.
2. 2019 साली शिर्डीतील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते. उष्माघाताने त्यावेळी गडकरींनी भोवळ आल्याचं बोललं जातंय.
3. डिसेंबर 2018 साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमातही गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर खुर्चीवर बसत असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर गडकरींना भोवळ आली. नंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत ठिक झाली.