नागठाणे – सातारा जिल्ह्यातील मोठी यात्रा म्हणून वर्णे-आबापुरीची यात्रा ओळखली जाते. जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेत फक्त धार्मिक कार्यक्रम पुजारी व मानकऱ्यांकडून होणार आहेत. छबिना निघणार नाही. यात्रास्थळापासून 10 किमी परिसरात संचारबंदी असून, कोणीही या परिसरात येऊ नये, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार आशा होळकर यांच्या सूचनेनुसार प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांची बैठक नुकतीच झाली. त्यात यासंबंधी निर्णय घेण्यात आला.
सरपंच विजय पवार, देवस्थानचे चेअरमन बळवंत काळंगे, विश्वस्त प्रवीण पवार, राजेंद्र पवार, तलाठी सौ. रेखा कोळी, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे, बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार बाबा महाडिक, पोलीस नाईक राजू शिंदे, किरण निकम, विजय साळुंखे, कपिल टिकोळे, विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.