- पाण्याबाबतची बैठक निष्फळ
- रावेत बधांऱ्याची उंची वाढविण्याचा पर्याय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध व्हावा. यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत शुक्रवारी (दि.2) बैठक झाली. या बैठकीत वाघोली योजना हस्तांतरण व कोणताही निर्णय होऊ न शकल्याने ही चर्चा निष्पळ ठरली. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी पुणे आयुक्तांकडून परवानगी घ्यायला सांगितले. तसेच अतिरिक्त पाण्यासाठी रावेत बंधाऱ्याची उंची वाढविण्याबाबत संबधितांना पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या आणि वाढती गरज लक्षात घेता शहराला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना पालिकेकडे हस्तांतरीत करण्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे 30 एमएलडी पाणी शहराला उपलब्ध होईल. यासंदर्भात अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीला महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
शहराची पाण्याची गरज भरून काढण्यासाठी सद्यस्थितीत पवना नदीवर असलेल्या रावेत बंधाऱ्याची उंची वाढवून अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना महापालिकेसह संबधित विभागाला पालकमंत्र्यांनी दिल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.
वाघोली योजना हस्तांतरीत करावी – आमदार लांडगे
वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीतून 30 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतके पाणी घेतले जाते. वाघोली योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र मौजे चिखली येथे असून तेथून वाघोली परिसराला पाणीपुरवठा केला जातो. दशलक्ष कोट्यासह पालिकेकडे हस्तांतरित केल्यास 28 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होईल. यासह चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, दिघी या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागाच्या पाणीपुरवठा विषयक अडचणी सुटण्यास व शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यास मदत होईल. त्यामुळे वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी यावेळी आमदार महेश लांडगे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या बैठकीसाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये काहीतरी तोडगा निघेल असे वाटले होते. मात्र, या बैठकीमध्ये काहीही निर्णय झाला नाही. पालकमंत्र्यांनी पुणे आयुक्तांकडून याबाबत परवानगी घ्यायला सांगितले. पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला तर ही योजना आपल्या शहरवासियांच्या कामी येईल. मात्र या बैठकीत काहीच निर्णय न झाल्याने चर्चा निष्फळ झाली आहे.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेता, पिं.चिं. महापालिका.