WTC Point Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला आहे. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी एक डाव आणि 32 धावांनी गमावल्यानंतर, रोहित आणि टीम टेबलमधील टॉप फाईव्हमधून बाहेर झाले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मालिका गमावल्यानंतरही पाकिस्तान संघाच्या स्थितीत बदल झालेला नाही.
टीम इंडियाचे मोठे नुकसान
सेंच्युरियनमधील पराभवामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. रोहित ब्रिगेड आता WTC पॉइंट टेबलमध्ये एक स्तर खाली घसरली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी पाचव्या स्थानावर असलेली टीम इंडिया आता सहाव्या स्थानावर आली आहे. पहिल्या कसोटीत भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. दुसऱ्या डावात संपूर्ण भारतीय संघ केवळ 131 धावांवर गारद झाला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आपल्या भूमीवर पहिल्या कसोटीत भारताला पराभूत करण्याचा मोठा फायदा झाला आहे. सेंच्युरियन कसोटीतील विजयानंतर दक्षिण आफ्रिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. पहिल्या कसोटीत डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना 185 धावांची स्फोटक खेळी केली. तर गोलंदाजीत रबाडा आणि नांद्रे बर्जर यांनी अप्रतिम कामगिरी केली.
पाकिस्तानचे स्थान बदललेली नाही
मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून बॉक्सिंग-डे कसोटी सामना हरल्यानंतरही, WTC पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे स्थान बदललेले नाही. संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. एका रोमांचक सामन्यात कांगारू संघाने पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. या पराभवासह पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिकाही गमावली.