वडगाव काशिंबेगमध्ये एकावर गुन्हा दाखल
मंचर- वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील व्यक्तींची कोराना टेस्ट फुकट झाली पाहिजे. भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये 4 हजार 500 रुपये घेतात. सरकारी अधिकारी झोप काढतात का असा प्रश्न पडलाय… असा चुकीचा मेसेज समाज माध्यमांवर टाकल्याप्रकरणी वडगांव काशिंबेग येथील एकाच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असून समाज माध्यमांवर करोनासंदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे मेसेज टाकण्यास बंदी आहे.
शनिवारी (दि. 30) वडगाव काशिंबेग येथील अंकुश वायकर या व्यक्तीने आपल्या एका ग्रुपवर करोनाची टेस्ट फुकट झाली पाहिजे, अशा मजकुराचा मेसेज टाकला होता. या मेसेजमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन समाजात अफवा पसरवली म्हणून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान एस. आर. मांडवे यांनी संबंधिताविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास मंचर पोलीस जवान सागर गायकवाड करीत आहेत.