पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सुरक्षित
शिक्रापूर- सध्या करोना विषाणूचा सर्वत्र प्रादुर्भाव असताना अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, काही जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी, कर्मचारी बाधित होत असताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या तत्परतेने पोलिसांना सुरक्षाकवच मिळाले आहे. पाटील हे पोलिसांसाठी करोना योद्धा ठरले आहेत. त्यांच्या विशेष दक्षतेमुळे आज ग्रामीण दलातील कर्मचारी, अधिकारी सुरक्षित आहेत.
पाटील यांनी जिल्ह्याला करोनाचा विळखा पडल्यानंतर स्वतः विशेष लक्ष दिले होते. पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी हे आपले कुटुंब असल्याचे समजून त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. लॉकडाऊन सुरू होताच ग्रामीण दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महिनाभर पुरेल इतके होमिओपॅथी औषध व गोळ्यांचे वाटप केले. आयुर्वेदिक पावडर देखील पाठवून दिली. पोलीस स्टेशनमध्ये औषध फवारणी मशीन, तापमापक यंत्र दिले. पोलिसांसाठी ऑनलाइन ध्यानधारणा, आरोग्यविषयक तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. दररोज सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विचारपूस केली जात आहे.
- पुणे ग्रामीणच्या कर्मचाऱ्यांना दिलासा
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे सर्व अधिकारी, कर्मचारी सुरक्षित, सदृढ आहेत. एकही पोलीस करोना बाधित नाही. ही पुणे ग्रामीण दलासाठी अभिमानाची बाब आहे.